मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या भांडूप भागातून या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
शनिवारी (३ मार्च) सकाळी संदीप देशपांडे शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी चेहऱ्यावर मास्क लावून काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि स्टम्पने जीवघेणा हल्ला केला. त्यांना हिंदूजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींकडून देशपांडेवरील हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची गांभीर्याने दखल घेत, स्वतः मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंची चौकशी केली होती. तसेच, हल्ल्यामागे जे कोणी आहे, त्याची चौकशी करुन आरोपींना कठोरातील कठोर शासन होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंना आश्वासन दिलं आहे. मुंबई पोलिसांकडूनही संदीप देशपांडेंवरील हल्ल्याची कसून चौकशी केली जात आहे. दादर पोलीस स्थानक, शिवाजी पार्क पोलीस स्थानक अशा सर्व जवळच्या पोलीस स्थानकांच्या टीम काल सकाळपासूनच याप्रकरणी तपास करत होत्या. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर नेमके कोण? हल्ल्यामागील त्यांचा नेमका हेतू काय? यांसारख्या अनेक गोष्टींचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तसेच, या घटनेतील संशयित आरोपी आणि संदीप देशपांडेंनी आरोपींचं जे वर्णन केलंय, त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
