ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी खेड येथे झालेल्या सभेमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गट यांच्यावर तोंडसुख घेतलं. तसेच, “आम्हाला देशद्रोही म्हणण्याची त्यांची हिंमत नाही नाहीतर जीभ हासडून हातात देईन, आम्ही देशद्रोही नसून देशभक्त आहोत”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले असून त्यावर आता भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शेलक्या शब्दांमध्ये टोला लगावला आहे. आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंची तुलना शोले चित्रपटातील असरानींच्या जेलर या व्यक्तिरेखेशी केल्याचं बोललं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मते मिळवली आणि नंतर गद्दारी केली. तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात? कोकणात शिमगा असल्याने जनता फारसे गांभीर्याने घेणार नाही. कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले. आधे इधर गए… आधे उधर गए.. अकेले “असरानी” बचगएं आता महाराष्ट्रात “असरानी” जिथे जिथे फिरतील तिथे तुफान मनोरंजन होणार, अशी जोरदार टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
