बीडच्या माजलगावात भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. आमदार प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात असलेल्या सूतगिरणीत रूपांतरित केलेल्या, वस्त्रोद्योग औद्योगिक संस्थेत झालेल्या करोडोच्या गैरव्यवहाराची तक्रार भाजप कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी शासनाच्या विविध विभागाकडे दाखल केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी अज्ञात सहा लोकांनी अशोक शेजुळ यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांचे दोन्ही पाय आणि हात फॅक्चर झाले.
अशोक शेजुळ यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगला सोळंके आणि उद्योजक रामेश्वर टवाणी यांच्यासह चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाजपा नेते अशोकराव शेजुळ यांच्यावर माजलगाव शहरातील शाहूनगर येथे ते दुचाकीवरुन जात असताना मोटरसायकलवरून पाठीमागून आलेल्या पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर रॉडच्या व धारधार शस्त्राच्या साह्याने हल्ला चढवला.यामध्ये त्यांच्या हातापायावर जबर मार लागला असून एक पाय मोडला आहे. त्यांच्या डोक्यावर देखील जबर मार लागला आहे. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
