अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात मांडणार

राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री या नात्याने प्रथमच अर्थसंकल्प मांडणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे अर्थशास्त्राचे अभ्यासक, जाणकार समजले जातात. अर्थखात्याचे मंत्री झाल्यावर त्यांचं हे पहिलंच बजेट आहे. दरम्यान, आर्थिक पाहणी अहवालात राज्याचा विकासदर 6.8 टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राज्याचा अर्थसंकल्प कसा असावा, त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, काय तरतूद अपेक्षित आहे, यासाठी राज्यशासनाकडून जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. सर्वसामान्यांच्या सूचना समोर ठेवून हा अर्थसंकल्प बनवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाबाबत सामान्य जनतेच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. अर्थसंकल्पामध्ये कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद करण्यात येणार? सर्वसामान्यांसाठी काय काय घोषणा करण्यात येणार याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

2022- 2023 या आर्थिक वर्षामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. काल -परवा झालेल्या पावसामुळे रब्बी पीकाचं मोठं नुकसान झालं. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यानं बळीराजा हवालदील झाला आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात निवडणुका असल्यानं काही लोकप्रिय घोषणा सरकार करू शकते अशी देखील चर्चा आहे.