उस्मान ख्वाजा आणि कॅमरुन ग्रीन यांच्या अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून आर अश्विन याने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने बिनबाद 36 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 16 तर शुभमन गिल 17 धावांवर खेळत आहेत. भारत अद्याप 444 धावांनी पिछाडीवर आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. ऑस्ट्रेलिया संघाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १८० धावांची खेळी केली.तर कॅमरुन ग्रीनने ११४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी खालच्या फळीतील फलंदाजांनी देखील मोलाचे योगदान दिले. शेवटी टॉड मर्फीने ४१ आणि लायनने ३१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावांचा डोंगर उभारला आहे.
अहमदाबाद येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने जवळपास दोन दिवस फलंदाजी केली. उस्मान ख्वाजा आणि ग्रीन यांनी खेळपट्टीवर पाय रोवले होते. ते विकेट टाकत नव्हते. विकेट पडत नाही, हे लक्षात येताच भारतीय गोलंदाजांनी धावांवर अंकूश ठेवला. भारतीय गोलंदाजांनी धावगती रोखली. त्यामुळे दोन दिवसाच्या फलंदाजीनंतरही ऑस्ट्रेलियाला 500 धावांचा पल्ला पार करता आला नाही. भारताकडून आर. अश्विन याने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. अश्विन याने जवळपास 48 षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 15 षटके निर्धाव टाकली. त्याशिवाय मोहम्मद शामी याने दोन विकेट घेतल्या. तर रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
