शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या एक व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दिली आहे. रविवारी रात्री उशीरा शीतल म्हात्रे यांनी याबाबत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली. आपला हा खोटा व्हिडीओ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनीच व्हायरल केल्याचा थेट आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते. या रॅलीतला एक व्हिडीओ कुणी तरी मार्फ केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. दहिसर पोलिसांनी तक्रार नोंदवून एका आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे. दुसरीकडे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते रात्रभर दहिसर पोलीस ठाण्यासमोर जमा झाले होते. शीतल म्हात्रे यांनी मातोश्री नावाच्या पेजवर हा व्हिडिओ मॉर्फ करून चुकीच्या पद्धतीने मजकूर लिहून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे.
