मुंबई : मागच्या काळात आपले सरकार असताना धनगर समाजाकरता 22 योजना सुरू करून त्यासाठी हजार कोटी रुपये दिले होते. पण दुर्दैवाने सरकार गेले आणि योजना सुरू होऊ शकल्या नाहीत. आता पुन्हा एकदा ते हजार कोटी रुपये आपण धनगर समाजाकरता उपलब्ध करून देत आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याबद्दल राज्यभरातून आलेल्या धनगर भगिनी-बंधूंनी मुंबई भाजपा कार्यालयात जल्लोष केला. धनगर, वडार, गुरव, रामोशी, लिंगायत अशा संख्येने लहान असणाऱ्या समाज घटकांसाठी राज्याची तिजोरी खुली करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. धनगरी घोंगडे, फेटा आणि बरची देऊन उपमुख्यमंत्र्यांचा गौरव करण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आमदार गोपीचंद पडळकर, कृपाशंकर सिंह आदी यावेळी उपस्थित होते.
धनगर समाजाने केलेल्या सत्काराबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ऋण व्यक्त करून फडणवीस म्हणाले, प्रत्येक धनगर वाडी-वस्तीवर शिक्षण, आरोग्य, व्यापार आणि अन्य विकास पोहोचला पाहिजे. यासाठी धनगर वाड्या-वस्त्या जोडणाऱ्या रस्त्यांसाठी 4 हजार कोटी रुपये आपण दिले आहेत. वेगवेगळ्या समाज घटकांसाठी महामंडळे आपण सुरू केली. त्यावरही विरोधक प्रश्न उपस्थित करतात. पण या राज्यात ‘सारथी’ कोणी स्थापन केली? ‘महाज्योती’ कोणी स्थापन केली? या संस्था माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आपण सुरू केल्या. आज या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून मराठा आणि ओबीसी समाजासाठी अनेक योजना सुरू झाल्या असून त्याचा लाभ त्यांना मिळत आहे.
फडणवीस म्हणाले, यावेळचा अर्थसंकल्प मांडताना तो केवळ मूठभर लोकांचा असू नये. समाजातल्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीचा अर्थसंकल्प असला पाहिजे असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी घेतला. म्हणूनच या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचे प्रतिबिंब उमटले आहे. ज्यांच्यासाठी हे राज्य निर्माण झाले, त्यांच्या पर्यंत 75 वर्षानंतरही विकास पोहोचला नसेल तर त्याला लोककल्याणकारी राज्य कसे म्हणायचे? असा सवाल करून फडणवीस म्हणाले, 2014 साली देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर गरीबांसाठीच्या योजना चालू झाल्या. गरीबांना पाणी, वीज, शौचालये, घर, गॅस सिलेंडर तसेच रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मोदीजींनी काम सुरू केले. प्रत्येक गरीबाचा विचार मोदीजींनी केला.
अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, आता या बजेटच्या विरोधात बोलण्यासारखे काही राहिले नाही म्हणून हा पैसा येणार कुठून, असा खोटा प्रचार काहींनी चालू केला आहे. पण काही काळजी करू नका. ज्यावेळी मी बजेट तयार करतो, सगळ्या गोष्टींचा विचार करतो. मी ज्यावेळी ५० हजार कोटी रुपयांच्या ‘नागपूर-मुंबई एक्सप्रेस वे’ची कल्पना मांडली, तेव्हा हेच विरोधक होते. ते काय म्हणायचे? “सगळ्या राज्याकरता आपण 8 हजार कोटी रुपये खर्च करतो आणि येथे एका रस्त्यासाठी 50 हजार कोटी रुपये खर्च करायला निघाले आहेत. कशाच्या भरवशावर हा महामार्ग होईल? पण माननीय एकनाथ शिंदे आणि मी हा महामार्ग करून दाखवला.
520 किलोमीटरचा महामार्ग तयार झाला. उरलेल्या दीडशे किलोमीटर रस्त्याचे उद्घाटन येत्या सहा महिन्यात होईल. म्हणून जेवढ्या घोषणा केल्या त्या सगळ्या अस्तित्वात आणण्याचे काम आमचे आहे. विरोधकांचे टीका करत राहतील. पण आपण ठरवले आहे. आम्हाला पंडित दीनदयाळ यांनी अंत्योदयाची शिकवण दिली. जोपर्यंत शेवटच्या रांगेतला माणूस पहिल्या रांगेत येत नाही तोवर देशाचा आणि समाजाचा विकास होऊ शकत नाही. हेच तत्व घेऊन विविध समाज घटकांना एकत्र करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.
