बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर, जयकुमार गाेरे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबाेल

सातारा : बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास देणारा गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर बसला. त्यामुळे महाराष्ट्रावर मोठं संकट आलं. आम्हाला वेदना झाल्या; पण आता विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच  होणार, यासाठी काम सुरू आहे.

आपणही आता कामाला लागू, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष अआमदार जयकुमार जयकुमार गोरेयांनी केले.भिलार (ता. महाबळेश्वर) येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जिल्हा भाजप कार्यकारिणीची बैठक आणि दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबिराचे समारोप प्रसंगी आमदार गोरे बोलत होते. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, रवी अनासपुरे हे उपस्‍थित होते.

आमदार गोरे म्हणाले, ‘ज्या योजनेतून अनेकांचे जीव वाचले, अनेकांच्या संसाराला हातभार लागला, ती मुख्यमंत्री साहाय्यता निधी योजना बंद करणारा पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्‍या रूपाने महाराष्ट्राने पाहिला. देवेंद्र फडणवीस यांनी अथक परिश्रमातून तयार केलेला अर्थसंकल्प वाचताना उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे सुतकी चेहरे पाहण्यासारखे होते. आम्ही बहुमताने निवडून आलो; पण सत्तेच्या बाहेर राहावं लागलं.

राष्ट्रवादीने  पण 40 वर्षे एकहाती पाठीशी राहिलेल्या या सातारा जिल्ह्याला त्यांनी काय दिलं? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. सारी विकास केंद्रे बारामतीला नेली, कर्मवीर, यशवंतराव या संस्थांबरोबर त्यांनी औंधचे संस्थानही ताब्यात घेतलं. आता त्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची वेळ आली आहे.  जिल्ह्यात आपली लढाई विचारांची आहे, ती राष्ट्रवादीबरोबर आहे, त्यांचा पाडाव करण्याची आपली मानसिकता असायला पाहिजे.