रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या कार्यकारी संचालकावर गुन्हा दाखल

पुणे : बारामती ॲग्रो कारखान्याने मुदतीपूर्वीच गाळप हंगाम सुरू केल्याप्रकरणी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुभाष जे. गुळवे (रा,शेटफळगडे साखर कारखाना, ता. इंदापुर ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय ठकुजी गोंदे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

मंत्री समितीचा निर्णय तसेच साखर आयुक्त कार्यालयाच्या दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या परिपत्रकीय सूचनांचे उल्लंघन करून बारामती ॲग्रो शेटफळ तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी दि. 10 ऑक्टोंबर 2022 रोजी विना परवाना १५ ऑक्टोंबर 2022 पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचे अप्पर निबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 7 डिसेंबर 2022 रोजी शासनास सादर केलेल्या चौकशी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साखर आयुक्त यांच्याकडून मिळालेल्या ६ मार्च २०२३ रोजीच्या पत्रानुसार बारामती ॲग्रो कारखान्याने गाळप हंगामाचा परवाना न घेता 15 ऑक्टोंबर 2022 पूर्वी गाळप सुरू केले गेले. त्यामुळे कारखान्याचे कार्यकारी संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.