मुंबई: राज्य सरकार पुरस्कारप्राप्त कलाकारांना आता क वरून अ वर्गाची पेन्शन योजना सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
ढोलकी तमाशा फड महोत्सवा बरोबरच तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, राज्याचे सांस्कृतिक धोरण लवकरच जाहीर केले जाणार आहे. या सांस्कृतिक धोरणासाठी दहा उपसमित्या नियुक्त केलेल्या आहेत सांस्कृतिक धोरण नियोजनबद्ध आवश्यक आहे. त्यासाठी टाईम टेबल ठरवले जाणार आहे. ज्या कलावंतांना राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. त्या कलाकारांना आता राज्य सरकार ३१५० रुपये इतकी पेन्शन देणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
यावेळी सन २०१८-१९ चा तमाशाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार कै. गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांच्या कन्या अल्का संगमनेरकर व कल्पना संगमनेरकर यांनी स्वीकारला. सन २०१९-२० चा पुरस्कार श्री. अतांबर शिरढोणकर यांना आणि २०२०-२१ चा पुरस्कार संध्या रमेश माने यांना यावेळी प्रदान करण्यात आला.
