पत्रकार शशिकांत वारिशेंचा अपघात जाणीवपूर्वक घडवला; विधानपरिषदेत सरकारची लेखी उत्तरात कबुली

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणाचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. वारिसेंच्या हत्या प्रकरणी विरोधकांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला राज्य सरकारने उत्तर दिलंय. शशिकांत वारिशे यांचा नाणार परिसरात जाणीवपूर्वक वाहन अपघात घडवून आणल्याची माहिती सरकारने दिलीय. सध्या या प्रकरणी एसआयटीची चौकशी सुरू असल्याची देखील सरकारचं लेखी उत्तरात माहिती दिलीय. तर याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी चौकशी करून आरोपीवर शिक्षा करण्याची मागणी केलीय.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ‘महानगरी टाईम्स’ या वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. राजापूर येथील पेट्रोल पंपावर त्यांना थार गाडीने जोरात धडक दिली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरीहून कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शशिकांत वारिसे यांचा हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप रिफायनरीविरोधी संघटनेने केला आहे. रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणात कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक केली असून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर राज्य सरकारने लेखी उत्तर दिले आहे. ज्यामध्ये शशिकांत वारिशे यांची जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणला, असं राज्य सरकारने विरोधकांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये म्हटलं आहे. तसंच सध्या या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू असल्याची माहितीही दिली आहे.