अभिनेता सुबोध भावे त्याच्या मागील काही सिनेमांमुळे चर्चेत आहे. ‘बालगंधर्व’, ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ ते काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘हर हर महादेव’ या सिनेमामुळे सुबोध भावे चांगलाच चर्चेत आहे. सातत्यानं वेगवेगळे बायोपिक सिनेमे करणारा मराठीतील अभिनेता म्हणून त्याला ओळखलं जाऊ लागलं आहे. अशातच सुबोध भावे आणखी एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. ज्याचं नाव आहे ‘संत तुकाराम’. या सिनेमाचा खास वैशिष्ट्य म्हणजे सिनेमातून सुबोध भावे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुबोधचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा ठरणार आहे.
यासगळ्यात सुबोधच्या एका पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यानं येत्या काळात आपण कोणत्या भूमिकेत दिसणार आहोत, याविषयी सांगितलं आहे. सुबोध हा जगद्गगुरु संत तुकाराम यांच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. सुबोधनं तो फोटो शेयर करताच त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु झाला आहे. कित्येक चाहत्यांनी त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सुबोध भावेनं “संत तुकाराम” या चित्रपटाबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, ‘आज “संत तुकाराम” या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील “तुकाराम महाराज” यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे. ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल माझे दिग्दर्शक आदित्य ओम यांचा मी कायमचा ऋणी आहे. तुकाराम महाराज साकार करण्यामागे एक फार छान गोष्ट आहे. ती यथावकाश कथन करीन. माझे निर्माते आणि संपूर्ण संघाचे मनपूर्वक आभार. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखीलिया!’
