लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण

नाशिक :लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा नाशिकच्या सिन्नर येथील नांदूर शिंगोटे या गावात उभारण्यात आला आहे. त्याच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या ( शनिवार, 18 मार्च ) हा सोहळा सकाळी दहा वाजता पार पडणार आहे. एका तळ्यात हे स्मारक करण्यात आले आहे. दोन एकर यासाठी जागा लागली आहे. तळ्याच्या मध्यभागी जवळपास सोळा फूट उंचीचा गोपीनाथ मुंढे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. हा संपूर्ण पुतळा ब्रांझचा असून संपूर्ण दोन एकर तळ्याला आकर्षक असे रूप देण्यात आले आहे.

यावेळी नितीन गडकरी, पंकजा मुंडे, मुख्यमंत्री आणि सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याला जवळपास 50 हजार नागरिक उपस्थित राहतील असा योजकांचा अंदाज आहे. दरम्यान या कार्यक्रमाला इतर नेतेही उपस्थित राहणार आहे. यामध्ये पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, प्रीतम मुंडे, हेमंत गोडसे यांचीही उपस्थिती असणार आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोकं या सोहळ्याला उपस्थित राहतील असा अंदाज आयोजकांना आहे. यामध्ये विशेष म्हणजे नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर असणार आहे. त्यामुळे दोन्ही नेते काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे.