अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी दिला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंबरनाथ शहराची वाढ होत असून जागतिक पातळीवर त्याचे नाव होत आहे. या वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुमारे ७७५ कोटींचा निधी दिला आहे. या शहराकडे माझे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष असून येथील विकासासाठी सढळ हस्ते मदत करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अंबरनाथ शिवमंदिर येथे डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, डॉ. बालाजी किणीकर, माजी आमदार रवींद्र फाटक, नरेंद्र पवार, गोपाळ लांडगे, सुनील चौधरी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी शिव मंदिरात जाऊन श्री महादेवाचे पूजन करून दर्शन घेतले.यावेळी प्राचीन शिवमंदिरवरच्या गाण्याचे सादरीकरण कलाकारांनी केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्मिती केलेल्या अंबरनाथच्या विकासावरील लघुपटाचे सादरीकरण झाले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसराला यापूर्वीही भेट दिली आहे. मात्र आता शिव मंदिर परिसर बदलत असून येथे विकास करण्यात येत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर 138 कोटी रुपये शिवमंदिर परिसराच्या विकासासाठी दिले. त्याशिवाय या शहराचे आरोग्य चांगले राहावे यासाठी घनकचरा प्रकल्पासाठी १५० कोटी, रस्त्यांच्या कामासाठी २२२ कोटी, जिल्हा वार्षिक योजनेतून १०७ कोटी, दलित वस्तीमधून 32 कोटी, वैशिष्ट्यपूर्ण मधून ७८ कोटी, इतर कामासाठी दिले ४८ कोटी निधी दिला आहे.अंबरनाथ वाढतंय, या वाढत्या शहराच्या गरजाही मोठ्या आहेत. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आणि निधी मिळविला. त्याचबरोबर या शहराची सांस्कृतिक गरज देखील भागवली पाहिजे म्हणून अशा प्रकारचा मोठा शिवमंदिर फेस्टिवल त्यांनी सुरू केला आणि म्हणून हजारो लोक या ठिकाणी त्याचा आनंद घेतायत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.