मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती मेगा टेक्स्टाईल पार्कला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली आहे. या मंजुरीबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. या पार्कमुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं फायदा होईल तसेच तीन लाख रोजगार निर्मिती होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महाराष्ट्रात मोठा प्रकल्प उभा राहात आहे. अमरावती जिल्ह्यात १० हजार कोटींची गुंतवणूक असलेला मेगा टेक्स्टाईल प्रकल्प उभा राहात आहे. या प्रकल्पामुळे थेट १ लाख रोजगार निर्मिती होईल आणि अप्रत्यक्षपणे ३ लाख लोकांना रोजगार मिळेल. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचं फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलेल
या पार्कमुळे तेथे मोठ्या प्रमाणावर समृद्धी येईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कॉटन बेल्ट आहे कॉटन बेल्ट मध्ये अशा प्रकारचा पार्क आल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा मिळेल या पार्कमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थव्यवस्था बदलण्यासाठी देखील एक मोठी महत्त्वाची मदत होणार आहे. मी माननीय पंतप्रधान यांचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने मनापासून आभार मानतो असे फडणवीस यांनी सांगितले.
येथे आहे टेक्स्टाईल पार्क
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे हा भव्य टेक्स्टटाईल पार्क उभारण्यात आला आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होते. त्यामुळे वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने मोठी क्षमता महाराष्ट्रात आहे. विदर्भातील अमरावती विभागात सुद्धा कापसाचे मोठे उत्पादन होते. त्यामुळे कापूस उत्पादकांना तेथेच उत्पादनाच्या विक्रीची हमी आणि चांगला भाव मिळावा, या उद्देशातून टेक्स्टाईल पार्कच्या संपूर्ण पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे.
