मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडच्या गोळीबार मैदानात आज जाहीर सभा आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे.सभा स्थळी हजारोच्या संख्येने खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत. भव्य स्टेज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मुख्यमंत्र्यांचा भाषण हे ऐकता यावं, पाहता यावं या अनुषंगाने एलईडी स्क्रीन देखील उभारण्यात आलेले आहेत. मैदानाच्या चारही बाजूने भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.
दरम्यान, ज्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती त्याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेत एकनाथ शिंदेंसह त्यांच्याबरोबर गेलेल्या 40 अमदारांवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टिकेनंतर शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.
ज्यांनी बाळासाहेबांचे विचार कधी ऐकलेही नाहीत ते आम्हांला बाळासाहेबांचे विचार शिकवणार? काय आहेत बाळासाहेबांचे विचार? नोकर्या जाऊ द्या हे विचार नव्हते, भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढणार्या शिवसेनेचा विजय असो हा विचार घेऊन शिवसेनेची स्थापना झाली असल्याचे ठाकरे म्हणाले होते. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागले आहे.
