अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अखेर बुकी अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने जयसिंघानी याला अटक केली आहे. त्याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले आहे. जयसिंघानी याला अटक केल्याने आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा हिला आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
अनिल जयसिंघानी याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अनिल जयसिंघानी यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस अनिल जयसिंघानी यांचा शोध सुरु होता.मे २०१९ मध्ये त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. क्रिकेट बेटिंगप्रकरणात अनिल जयसिंघानी यांना अनेकदा अटक करण्यात आलेली आहे.
