अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे. समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी रविवारी नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली होती. संघाच्या मुख्यालयात समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनी केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीवर जाऊन फुलं वाहिली आणि हात जोडले होते. त्यामुळे समीर वानखेडे आता भाजपमध्ये जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
समीर वानखेडे हे एनसीबीचे अधिकारी आहेत. मुंबईतील क्रुझ ड्रग्स प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते. या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे होता. याच प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र या प्रकरणात जात पडताळणी समितीकडून त्यांना क्लीन चिट देण्यात आली.
