सनातन धर्म देशाला लागलेली कीड, जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त नेते जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माविषयी धक्कादायक विधान केलं आहे ज्या नंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आव्हाड नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहत असतात, मात्र यंदा आव्हाडांनी सनातन धर्माविषयी केलेलं वक्तव्य त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविषयी बोलताना आव्हाड यांची जीभ घसरली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सनातन धर्माचा प्रचार करणाऱ्यांना मुंबईत बोलावून सभा घेतल्या जात आहेत. हे आमचं दुर्दैव आहे.सनातन धर्माची व्याख्या आणि सनातन धर्म म्हणजे काय? हे आपण समजूनच घेत नाही. ते सनातन धर्माला हिंदू धर्माशी जोडून आपल्या हातात देतात. पण सनातन धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. सनातन धर्माने पाच हजारहून अधिक वर्षे येथे वर्णव्यवस्था राबवली. येथील ९५ ते ९७ टक्के समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवलं. अधिकारापासून वंचित ठेवलं. तो सनातन धर्म आहे.”

या सनातन धर्मीयांविरुद्ध गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, श्रीपाद अमृत डांगे असे लोक उभे राहिले. हे मोठे-मोठे ब्राह्मण लोक या व्यवस्थेविरोधात बोलले. ते ब्राह्मणांविरुद्ध नव्हते, पण लोकांच्या डोक्यात जो ब्राह्मण्यवाद होता, जो आजही आहे. याने सर्वाधिक हानी होत आहे. यात ब्राह्मणांचा काहीही दोष नाही. ब्राह्मण याच्यात पिसले जातात. कारण नसताना बिचाऱ्यांना वाईटपणा येतो. येथे मोठे मोठे पुरोगामी विचारधारा बाळगणारे आणि त्याला पुढे नेणारे ब्राह्मण होते. हेही मला समाजाला सांगायचं आहे.

“आगरकर हे मागासवर्गीय नव्हते, ते ब्राह्मण होते. ते प्रोफेसर होते. गोपाळ कृष्ण गोखले यांना गांधीजी आपला बाप मानायचे. ते गोपाळ कृष्ण गोखले हे ब्राह्मण होते. पण ते पुरोगामी विचारांचे होते. त्यामुळे सनातन धर्म हा देशाला लागलेली कीड आहे. ही कीड पोसू नका. येथील अठरा पगड जातींनी याचा विचार करायला हवा. सनातन धर्म परत मागच्या दाराने पुढे येऊ पाहतंय. परत महिलांना घरी बसवा, पाळी आली असेल तर तिला घराच्या बाहेर बसवा, विधवा झाली तर तिचे केस उपटून काढा… अशा प्रथा आणू पाहतंय, हे जरा वाचा. शाहू-फुले-आंबेडकर यांनी या समाजात किती बदल घडवून आणला याचा विचार करा,” असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.