पुणे : आर्मीमध्ये भरतीचे आयुष्यभराचे स्वप्न. परीक्षा पास होऊनही पोलीस व्हेरिफिकेशनचा अडथळा आला. देशसेवेचे स्वप्न भंग होण्याच्या भीतीने हताश झाला असतानाच शेवटचा आशेचा किरण म्हणून फेसबुकद्वारे संपर्क साधला अन् चमत्कार झाला. मी देवेंद्र फडणवीस बोलतोय असा फोन आला आणि शुभमला जणू देवच पावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेबाबत शुभम शिवाजी बोटे याने ट्विटरवरून कृतज्ञता व्यक्त केली आहे. साहेब तुमच्या नावातच देव आहे. तुम्ही खरोखर देव आहात अशी सुरुवात करत शुभमने म्हटले आहे. मित्रांनो मी नुकताच आर्मीत भरती झालो. परंतु पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये काही अडथळे आले. ते सुटता सुटत नव्हते. हातातोंडाशी आलेली नोकरी गेली याच अपेक्षेने घरी बसलो. माझा जीव कासावीस झाला. आई – वडिलांच्या कुशीत डोके ठेऊन मोठमोठयाने रडत होतो. आर्मी मधे जाऊन देशसेवा करण्याच माझ स्वप्न भंगले गेले होते. डोळ्यापुढे संपुर्ण अंधार होता.
फेसबुक सोशल मीडिया स्क्रोल करत असताना देवेंद्रजी फडणवीस यांची फेसबुक अपडेट पुढे आली. माझ्यासोबत झालेला प्रकार देवेंद्रजींना सांगुन काय होतय का याची चाचपणी सुरु केली. देवेंद्रजींच्या पोस्टवर रोज लाईक कमेन्ट करणाऱ्या २-३ कार्यकर्त्यांना फेसबुक मेसेज केले.
शुभम पुढे म्हणतो, गणेश कराड यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील स्विय सहाय्यक मनोज मुंडे यांचा पर्सनल नंबर शेअर केला. आजच २० मार्च दुपारी दोन वाजता कागदपत्रे जमा करण्याची शेवटची वेळ होती. सकाळी माझा फोन वाजला. समोरुन आवाज होता मी देवेंद्र फडणवीस बोलतोय. हे एका चमत्काराच्या ही पलीकडे होतं. स्वतः साहेब बोलले. त्यांनी माझी अडचण ऐकून घेतली आणि सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या. पोलीस व्हेरिफिकेशनमधील सर्व अडचणी दूर झाल्या. माझ्या तोंडुन सुटलेला घास अलगद माझ्या मुखात घालण्याच काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. थँक्यू अन्नदाता असे म्हणत शुभमने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे खाजगी सचिव तसेच स्विय सहाय्यक देवराम पळसकर, खाजगी सचिव दिलीप राजूरकर आणि त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
