रत्नागिरी : गजानन कीर्तिकर यांनी किती खोके घेतले? ज्यांनी शिवसेनेसाठी आयुष्य वेचले, शेकडो केसेस अंगावर घेतल्या, त्यांच्यावर खोके घेतले म्हणून आरोप करता. रामदास कदम यांना संपवायला निघाले, योगेश कदम या उमद्या तरुणांना संपवायला निघाले, राष्ट्रवादीसोबत जाऊन खेडमधील २ नगरपरिषदा दिल्या. षण्मुखानंद येथे त्या सभेला येऊ नका, असे मी स्वतः रामदास कदम यांना सांगितले होते, कारण जसे मनोहर जोशी यांना शिवाजी पार्क येथे व्यासपीठावरून खाली उतरवायला लावले होते, तोच कट रामदास कदम यांच्याविरोधात रचण्यात आला होता. असे कोणता नेता आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कारस्थान रचतो. बाळासाहेब असते तर मनोहर जोशी यांच्याविषयी असे वागले असते का?
धर्मवीर आनंद दिघे जेलमध्ये होते तेव्हा बाळासाहेब त्यांना भेटायला गेले होते. बाळासाहेब कार्यकर्त्याला पुढे घेऊन जाणारे होते. नारायण राणेंचा काय गुन्हा होता? रामदास कदम, गुलाबराव पाटील यांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून त्यांचा आवाज बंद करता, असा पक्ष कसा मोठा होणार? कार्यकर्ता मोठा तर पक्ष मोठा होतो,असा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड येथे गोळीबार मैदान येथे आयोजित सभेत केला.
दरवाजे उघडेच ठेवा, सर्व बाहेर जाणार आहेत, तुम्ही दोघेच उरणार आहात, कारण तुम्ही शिवसेना कार्यकर्त्यांना मोठे होऊ दिले नाही, त्यांना संधी नाकारली अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत रविवारी खेड येथे केली.
बंड करण्याच्या आधी २० आमदार विचारायला गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जायचे त्यांना जाऊद्या, दरवाजे उघडे ठेवा म्हणाले. दरवाजे उघडेच ठेवा सगळे निघून जातील. फक्त तुम्ही दोघेच रहाल. हम दो हमारे दो, माझे कुटुंब माझी जबाबदारी, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड येथे गोळीबार मैदान येथे आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर टोला हाणला.
काहीच दिवसांपूर्वी खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली होती, याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही जाहीर सभा झाली. या जाहीर सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. याच मैदानात फुसका बार, आपटी बार येऊन गेला. उत्तर आरोप टीकेला द्यायचं असतं. तोच तोच थयथयाट तीच तीच आदळआपट त्याला काय उत्तर देणार? मुंबईतही असाच थयथयाट, आदळआपट मागचे सहा महिने सुरू आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
मी फिरणारा मुख्यमंत्री आहे, घरात बसून कारभार करणारा मुख्यमंत्री नाही. दिल्लीला, दावोसला गेलो तिकडून विकासासाठी निधी आणि एमओयू आणला. आमच्या अर्थसंकल्पाला तुम्ही गाजर हलवा म्हणालात, पण आम्ही तो तरी दिला, तुम्ही गाजरं दाखवत बसलात, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. कोकणात पूर आला, कोविड आला, तेव्हा एकनाथ शिंदे आला, घरात बसून आदेश देणारा मी मुख्यमंत्री नाही, असा निशाणाही एकनाथ शिंदेंनी साधला.
कोरोना काळात पीपीई कीट घालून काम केलं, हा आमचा गुन्हा आहे? रेमेडिसिविर इंजक्शन मिळवून दिली, हा आमचा गुन्हा आहे? ठाण्याच्या रुग्णालयातला ऑक्सिजन संपलं होतं, तेव्हा ऑक्सिजन मिळवून दिला, 450 जणांचा जीव वाचवला, हा आमचा गुन्हा आहे? एकनाथ शिंदेला दोनदा कोरोना झाला, पण मागे हटलो नाही. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, खोके म्हणता. माझ्याकडे बरंच काही आहे, पण मी ते बोलू इच्छित नाही, पण याचा अर्थ मला काही माहिती नाही, असं नाही. पण सहन करण्याची मर्यादा असते, मर्यादा संपण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असा इशाराही एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला.
येत्या काही दिवसांमध्ये महाविकासआघाडीच्या राज्यभरात सभा होणार आहेत, यावरूनही मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. सर्कशीप्रमाणे राज्यभरात त्यांचे शो होणार आहेत. तेच टोमणे, तेच आरोप तेच रडगाणं, फक्त जागा बदलत जाईल. त्यांच्याकडे खोके-गद्दार हेच दोन शब्द आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
