राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय दर्जा’ धोक्यात? निवडणूक आयोगाकडून फेरविचार सुरू

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय पक्ष’ या दर्जाचा फेरआढावा घेण्याच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने मंगळवारी आणखी एक पाऊल पुढे टाकले. राष्ट्रवादीचा हा दर्जा कायम ठेवावा का, याचा आढावा निवडणूक आयोग घेत असून, मंगळवारी पक्षाच्या नेत्यांना बोलावून त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली. राष्ट्रवादी व भाकपसह चार पक्षांवर त्यांचा ‘राष्ट्रीय’ दर्जा गमावण्याची टांगती तलवार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवावा का याबाबत सध्या निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच आयोगाच्या कार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देखील आपलं म्हणण मांडण्यासाठी बोलावण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार स्वतः राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे आयोगाच्या कार्यालयातून जाऊन आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक आयोगाने सध्या राष्ट्रीय दर्जा कायम ठेवण्यासाठी फेरआढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती करण्यात आल्याची माहिती आहे.

निवडणूक आयोगाने याआधीही राष्ट्रवादीसह चार पक्षांच्या राष्ट्रीय दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आयोगाने सप्टेंबर २०१९मध्ये राष्ट्रवादीसह मायावती यांचा बसप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) व तृणमूल काँग्रेस यांनाही सुनावणीसाठी समन्स बजावले होते. त्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी पाहता त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेऊ नये, अशी नोटीस आयोगाने तिन्ही पक्षांना बजावली होती.