‘राज ठाकरे जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री’, मनसेची शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी

आज गुढीपाडवा आहे. हिंदू धर्मातील वर्षाचा पहिला दिवस, राज्यात गुढीपाडव्याचा मोठा उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी गुढ्या उभारून मोठ्या जल्लोषात गुढीपाडवा साजरा करण्यात येत आहे. आज शिवाजी पार्कमध्ये मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र मेळाव्यापूर्वी मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. हे बॅनर सर्वांच लक्ष वेधून घेत आहेत.

दादरमधील शिवसेना भवनासमोर हे मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मनसेच्या माहिम विधानसभा शाखेने हे बॅनर्स लावले आहेत. मनसेचे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर्स लावले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री… हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे… असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आला आहे. तसेच हिंदू बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. या बॅनर्सवर राज ठाकरे यांचा मोठा फोटो आहे. भगवी शाल अंगावर पांघरलेला राज ठाकरे यांचा हा फोटो आहे. तर खाली लक्ष्मण पाटील यांचाही फोटो आहे.

आज संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात धडाडणार आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्याचा टीझरही मनसेकडून जारी करण्यात आला होता.