पाकिस्तानातच होणार आशिया चषक; भारतीय संघ खेळणार की नाही ?

टीम इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत खेळतात. आशिया कपच्या आयोजनावरुन गेल्या 6 महिन्यांपासून वाद सुरु होता. आम्ही पाकिस्तानात जाणार नाही, अशी भूमिका बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट समितीचे अध्यक्ष जय शाह यांनी घेतली होती. तर टीम इंडिया पाकिस्तानात आली नाही, तर आम्हीही आगामी एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी भारतात जाणार नाही, अशी आडमूठी भूमिका ही पाकिस्तानने घेतली होती. अखेर या वादावर पडदा पडल्याचं दिसून येत आहे. अखेर पाकिस्तान आणि बीसीसीआय यो दोन्ही क्रिकेट बोर्डाचं एकमत झाल्याचं समजतंय. रिपोर्टनुसार, सप्टेंबर 2023 मध्ये आशिया कपचं यजमानपद हे पाकिस्तानच करणार आहे. मात्र टीम इंडिया पाकिस्तान खेळणार नाही.

मात्र आता पीसीबी आणि बीसीसीआय या दोन्ही क्रिकेट बोर्डांनी सहमती दर्शवल्याचं समजत आहे. ईएसपीएन-क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्येच आयोजन होणार असल्याची शक्यता आहे. या शक्यतेमागे मोठं कारण आहे. ते म्हणजे पाकिस्तानसह दुसऱ्या देशातही स्पर्धेचं आयोजन करण्यावरुन पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यात एकमत झालंय. रिपोर्टमध्ये म्हटलंय त्यानुसार, पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामने हे त्रयस्थ ठिकाणी होणार असल्याच म्हटलं जातंय.

दुसरं ठिकाण कोणतं?
आता टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामने कुठे खेळवण्यात येणार हे तरी स्पष्ट नाही. मात्र यासाठी यूएई आणि श्रीलंकेची नाव आघाडीवर आहेत. तसेच ओमान आणि आश्चर्यकारक म्हणजे इंग्लंडचंही नाव चर्चेत आहेत. यामुळे पाकिस्तानसह यजमानपद मिळवणारा दुसरा देश कोणता ठरणार हे संबंधित देशातील हवामान आणि इतर गोष्टींवर अवलंबून असणार आहे.