मुंबई : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर उदय झाल्यापासून त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी राहूल गांधी राहिले आहेत. 2014 पासूनच्या सर्व निवडणुकांमध्ये माेदी विरुध्द राहूल गांधी असा सामना झाला. या प्रत्येक सामन्यात राहूल गांधींना हार पत्कारावी लागली. आता न्यायालयानेच राहूल गांधी यांना निलंबित केले असल्याने पंतप्रधानापदासाठीचे त्यांचे ओझे उतरविण्याची संधी काॅंग्रेस पक्षापुढे आहे. मात्र, काॅंग्रेसमधील दरबारी राजकारणी हे हाेऊ देणार का हाच प्रश्न आहे. मात्र, राजकीय तज्ज्ञांच्या मते राहूल यांच्यावर कायमच अपयशाचा डाग लागलेला आहे. राहूल गांधी यांनी 2004 मध्ये अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर प्रवेश केला. त्यावेळी काॅंग्रेस प्रणित संयुक्त पुराेगामी लाेकशाही आघाडीचे सरकार असूनही त्यांनी काेणतेही जबाबदारीचे पद घेतले नाही. उलट प्रत्येक वेळी यशाचे श्रेय घेतले मात्र अपयशाची जबाबदारी घेतली नाही.
२०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी जवळपास दोन महिने प्रचार करून २०० सभा घेतल्या. काँग्रेसला केवळ 28 जागा मिळून राज्यातील चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. अमेठी लोकसभा मतदारसंघातील १५ जागांपैकी काँग्रेसला केवळ दाेन जागा जिंकता आल्या हाेत्या. त्यानंतर 2014 च्या लाेकसभा निवडणुकीतही राहूल गांधी यांच्या चेहऱ्यावरच काॅंग्रेसने निवडणुका लढविल्या. मात्र, इतिहासातील निचांकी जागा मिळविण्याची वेळ त्यांच्यावर आली. पराभवानंतर ज्या तडफेने रस्त्यावर उतरायला हवे हाेते तसे राहूल गांधी उतरले नाहीत. ‘चाैकीदार चाेर है’, राफेल घाेटाळा यासारखे मुद्दे काढून थेट नरेंद्र माेदी यांच्याविराेधात आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाेकांनी त्यांना नाकारले.
2019 मध्ये अमेठी या पारंपरिक मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला. पक्षाच्या दारुण पराभवानंतर जबाबदारीने सूत्रे हाती घेण्याएवजी त्यांनी काॅंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या सगळ्या परिस्थितीत माेदींविरुध्द राहूल गांधींना उभे करून काॅंग्रेस काय साध्य करू पाहते, असा प्रश्न अनेक राजकीय तज्ज्ञांना पडताे. काॅंग्रेसमध्ये गांधी घराण्याशिवाय काेणाला स्वीकारले जात नाही असे म्हणतात. परंतु, देशातील जनता मात्र या मताची नाही काॅंग्रेसमधीलच काही दरबारी राजकारण्यांना हे हवे आहे का असा प्रश्नही उपस्थित हाेताे. त्यामुळेच राहूल गांधी यांची रद्द झालेली खासदारकी काॅंग्रेससाठी संधी आहे.
माेदींविराेधात सातत्याने पराभव स्वीकारणाऱ्या राहूल गांधी यांच्या जागी एखादा नवा चेहरा त्यांना आणावा लागेल. काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षा साेनिया गांधी यांनी आपल्या परदेशी असल्याच्या मुद्याला हाेणारा विराेध पाहून 2004 मध्ये मनमाेहन सिंग यांना पंतप्रधानपदी संधी दिली हाेती. 2009 च्या लाेकसभा निवडणुका या मनमाेहन सिंग यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या गेल्या हाेत्या. विशेष म्हणजे त्यावेळी काॅंग्रेसने चांगली कामगिरी केली हाेती. उत्तर प्रदेशात पक्षाने जनाधार निर्माण केला हाेता. आता राहूल गांधी यांच्यासाठी मनमाेहन सिंग काेण हा प्रश्न आहे. रिझर्व्ह बॅंकेचे माजी अध्यक्ष रघुराम राजन हे एक नाव हाेऊ शकते. परंतु, गांधी कुटुंबाशिवाय इतर काेरी पक्षाचे उरले सुरले आणि जनाधार नसलेले नेते स्वीकारणार का? हा प्रश्न आहे.
