ट्रिपल तलाकचे प्रकरण आले समोर; ५० लाखांसाठी विवाहितेचा शारीरिक छळ

पुणे : व्यवसायासाठी वडिलांकडून ५० लाख रुपये घेऊन येण्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. तसेच, तिच्या इच्छिविरोधात अनैसर्गिक लैंगिक कृत्य करून त्रास देण्यात आला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पतीसह सासू-सासरे आणि नंदे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पतीने तीन वेळा तलाक तलाक तलाक असे म्हणून घटस्फोट देत धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी २३ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी ४९८, ३७७, ५०४, ५०६, ३४ सह मुस्लिम वुमन (प्रोटेक्शन) ऑफ राईट ऑन मॅरेज ॲक्ट २०१९ च्या कलम तीन व चार अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ नोव्हेंबर २०२० ते ३० मे २०२१ या कालावधी दरम्यान चिंचवड येथील एम्पायर इस्टेट सोसायटीत घडला. आरोपी यांनी पतीच्या व्यवसायासाठी वडिलांकडून ५० लाख रुपये घेऊन येण्याची जबरदस्ती पीडित महिलेवर केली.

तिला शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास दिला. पतीने अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करून ती क्रूर व असह्य त्रास होईल अशी वर्तणूक केली. आरोपींनी तिच्यासोबत वारंवार भांडण केले. पतीने रागाच्या भरात तिला तलाक तलाक तलाक असे तीन वेळा म्हणून ‘आता कुठे जायचे तेथे जा’ असे म्हणत चुलत्या बरोबर गरोदर अवस्थेत वडिलांच्या घरी पाठवून दिले. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.