खोक्यांचा आरोप अंगाशी, उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना दिल्ली हायकोर्टाचे हजर राहण्याचे आदेश

शिवसेनेतील फुटी नंतर चाळीस आमदारांवर खोके घेतल्याचा तसेच निवडणूक आयोगाने दोन हजार कोटी रुपये देऊन धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या चांगलाच अंगाशी आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या तिघांनाही प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की ठाकरे – राऊतांनी आमदार – खासदारांची बदनामी केली. पक्ष चिन्ह, नाव मिळवण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा केल्याचा आरोप केला .आमदारांना 50 कोटी दिले, घाण शिवसेनेतून बाहेर पडली, 50 खोके एकदम ओक्के” हे वक्तव्य केले.

असे खोटे, बनावट आणि निराधार आरोप करून बदनामी केली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तसेच निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह देण्याचा घेतलेला निर्णय यावरही ठाकरे यांच्याकडून आक्षेप घेण्यात येत आहेत. शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांवर घृणास्पदआरोप करण्यात येत आहेत. आमदार/खासदारांना 50 कोटींना विकत घेतले असे म्हणून बदनामी केली. वादाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर अनेक याचिका प्रलंबित आहेत. तरीही वारंवार आरोप केले जात असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. त्याची दखल घेऊन दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे पिता पुत्रांना आणि संजय राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.