तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ; देवी-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मनावर अधिराज्य गाजवते. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. ओटीटी विश्वातदेखील तिने आपला दबदबा कायम ठेवला आहे. सिनेमांमुळे चर्चेत असलेली तापसी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते. आता पुन्हा एकदा तापसी पन्नू विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तापसी पन्नूने 14 मार्च रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला होता. हा व्हिडिओ एका फॅशन शोचा आहे. तापसीने बोल्ड ड्रेसवर आराध्य देवी लक्ष्मीमातेचे लॉकेट गळ्यात घातले होते. या प्रकरणी हिंदू संघटनेने आक्षेप नोंदवला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये तापसी पन्नूविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तापसीवर सनातन धर्माची प्रतिमा दुखावल्याचा आरोप आहे. आता याप्रकरणी इंदूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. छत्रीपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकलव्य गौर नामक व्यक्तीने तापसी पन्नू विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्या व्यक्तीने तापसीने सनातन धर्माचा अपमान केल्याचं म्हटलं आहे.” अभिनेत्रीने जाणूनबुजून हिंदू समाजाचा अपमान केल्याचे गौर यांचे मत आहे. तापसी पन्नूच्या विरोधात बीजेपी नेत्याच्या मुलानं इंदौर येथील छतरीपुरा पोलिस स्टेशनमध्ये एक निवेदन दिलं आहे. हिंदू रक्ष संघटनेचा संयोजक असलेल्या एकलव्य गौरने छतरीपुरा पोलिस ठाण्यात अभिनेत्री तापसी पन्नू विरोधात कारवाई करण्या संदर्भात हे निवेदन दिलं आहे.