नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव; संयोगिताराजे संतापल्या

छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. संयोगिताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महतांनी विरोध केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासंदर्भात त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंतांनी दर्शनासाठी आलेल्या संयोगिताराजे यांच्यासमोर पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला अशी पोस्ट छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीता राजे छत्रपती यांनी केली आहे. पूजेदरम्यान काळाराम मंदिरातील महंतांनी संयोगीताराजे यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, संयोगीता राजे यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे की, मी मंदिरात महामृत्युंजय मंत्र म्हटला. मंदिरातील महंतांनी पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हटले. मात्र शाहू महाराजांनी कर्मकांडाला विरोध केल्याने व आपण त्या घराण्याचा वारसा चालवत असल्याने त्यास विरोध केला. या वेळी मात्र महंतांनी तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट केले. मात्र यास न जुमानता मी या ठिकाणी महामृत्युंजय मंत्र, रामरक्षा पठण केले. त्यावेळी त्यांना सांगितले ज्या मंदिरात आपण आजच्या काळातही नियम लावत आहात, ती मंदिरे वाचवली कोणी? छत्रपतींनी वाचवली! मग छत्रपतींना शिवकण्याचे धाडस करू नका, अशा शब्दांत पोस्टद्वारे इशारा दिल्याचे दिसत आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे काळाराम मंदिराच्या विश्वस्तांकडून सांगण्यात आले.