आयपीएलच्या 16 व्या हंगामाला आजपासून सुरुवात; गुजरात-चेन्नई येणार आमने -सामने

आयपीएलच्या नव्या आणि तितक्याच रंजक पर्वाची सुरुवात अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपलेली आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलच्या पहिल्या सामन्याच चेन्नई आणि गुजरात हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मागील वर्षी आयपीएल गाजवणाऱ्या गुजरातच्या संघाकडून यंदाची सुरुवातही तितकीच दणक्यात करण्याचा मानस असेल. तर चेन्नईही त्यांचा डाव उधळून लावण्यासाठी तोडीस तोड खेळाडू मैदानात पाठवताना दिसणार आहे. त्यामुळं आता या सामन्यात बाजी कोण मारणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर संध्याकाळी 6 वाजल्यापासून थेट प्रक्षेपित केला जाईल. दोन्ही संघांच्या एकमेकांविरुद्धच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर चेन्नई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे.

पदार्पणात विजेतेपद मिळवून हार्दिक पंड्याच्या गुजरात संघाने सर्वांना चकित केले. समतोल संघ ही त्यांची बाजू संपूर्ण स्पर्धेत उजवी ठरली होती. यंदाही जवळपास तोच संघ असल्यामुळे आत्मविश्वास त्यांच्या बाजूने आहे; परंतु समोर चार विजेतेपद मिळवणारा, आणि भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनी असल्यामुळे गुजरातसाठी सलामीची ही लढत सोपी असणार नाही.