संभाजीनगरमध्ये काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. पहिल्यांदाच संभाजीनगरमध्ये ही सभा झाली होती. या सभेला अलोट गर्दी जमली होती. या सभेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार भाषणे झाली. पण ही सभा चर्चेत आली ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गैरहजेरी असल्यामुळे. त्यांच्या या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या.
संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची विराट सभा पार पडली. या सभेची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. सभेचे टिझर्स लॉन्च करण्यात आले होते. संभाजीनगरात चौकाचौकात पोस्टर्स, होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावण्यात आले होते. या पोस्टर्सवर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोटो होते. आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी मोठी तयारी केली होती
दरम्यान प्रकृती बरी नसल्याचं कारण देत पटोले संभाजीनगरला गेले नाहीत. मात्र, आज पटोले सुरतला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटायला जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संभाजीनगरच्या सभेला जाण्यासाठी त्यांची प्रकृती बरी नव्हती. सुरतला जाताना तब्येत कशी बरी झाली? 12 तासात पटोले अचानक ठणठणीत कसे बरे झाले? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर नाना पटोले महाविकास आघाडीवर नाराज असल्याचंही बोललं जात असल्यामुळे आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याची चर्चा रंगली आहे.
