लव्ह जिहाद’,धर्मांतराचे प्रकार झाल्यास त्या त्या भागातील पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, असे निर्देश महसूल मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. विखे म्हणाले, गुन्हेगारांच्या मिरवणुका काढल्या जातात, अशा गुन्हेगारांच्या मिरवणुका काढण्यापेक्षा गाढवावरून त्यांच्या मिरवणुका काढा त्यामुळे चांगला परिणाम होईल. मोक्का लावलेले गुन्हेगार मोकाटपणे फिरत आहेत. लव्ह जिहाद’, धर्मांतर असे प्रकार वाढत आहेत. आपले पोलिस काय करतात, पोलिसांनी गुन्हेगारांना कायद्याचे राज्य काय असते ते दाखवावे. असे प्रकार होत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही कुठल्याही परिस्थितीत यावर कारवाई झालीच पाहिजे.
खालच्या स्तराचा पोलीस कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हवालदारावर देखील कारवाई करण्याचा अधिकार नाही. अधिकाऱ्यांना बांधून ठेवू नका, पोलिसांनी वाढलेल्या गुन्हेगारीवर मोकळेपणाने काम करावे. गुन्हेगारीचे प्रमुख कारण असलेल्या वाळूमाफिया देखील वाळूच्या नवीन धोरणामुळे संपणार आहे असे देखील त्यांनी सांगितले.
