मी सर्वांना कामाला लावलंय ही वस्तूस्थिती आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून तिथे ते रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. तसेच तिथे ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील भेट घेणार आहेत. त्याआधी शिवसेनेचे कार्यकर्ते आज ठाण्यावरून विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ठाणे रेल्वेस्थानकात आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी ठाणे आणि नाशिक येथून प्रत्येकी एक-एक ट्रेन निघाली आहे. जवळपास तीन हजारापेक्षा जास्त शिवसैनिक आणि रामभक्त या ट्रेनने उद्या अयोध्येत पोहोचतील. प्रभू रामचंद्राचं दर्शन ते परवा घेतील. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश बघायला मिळतोय. मी कार्यकर्त्यांना भेटायला स्वत: आलेलो आहे. प्रभू रामचंद्राचं दर्शन कधी होतंय, अशा उत्साहात रामभक्त ट्रेनमधून अयोध्येच्या दिशेला रवाना झाले आहेत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की, ‘राम हे दैवत असून मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे. पटोले यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया विचारली असता, शिंदे म्हणाले की, आमच्यामुळे का होईना अनेक लोक रामलल्लांचं दर्शन घेत आहेत हे चांगलं आहे.एकनाथ शिंदे म्हणाले की, “माझ्या दौऱ्याची विरोधकांनी धास्ती घेतलीय की नाही हे मी म्हणणार नाही. पण मी सर्वांना कामाला लावलंय ही वस्तूस्थिती आहे.