पुणे : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकजुटीने राज्यभरात संयुक्त वज्रमूठ सभा घेत आहेत. महाविकास आघाडीच्या या संयुक्त सभांना संभाजीनगरातून सुरुवात झाली. तर पुढची सभा पुण्यात होणार आहे. संभाजीनगरच्या सभेत एका गोष्टीची जास्त चर्चा झाली. सभेतील व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची देण्यात आली होती. इतर खुर्च्यांपेक्षा वेगळी आणि उंच खुर्ची होती. त्यामुळे महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे असेल का? त्यांना विशेष खुर्ची देण्यात आली ती ‘सिंहासन’ होतं अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र आता या चर्चा टाळण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत वेगळीच मागणी पुढे आली आहे.
संभाजीनगरात उद्धव ठाकरेंना देण्यात आलेल्या खुर्चीवरून अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास असल्याने तशा प्रकारची खुर्ची देण्यात आली होती. वज्रमूठ सभेत असा कोणताही भेदभाव झालेली नाही, असं अजित पवार म्हणाले होते. मात्र पुण्यातील सभेत ही चूक टाळली जावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचं समोर आलंय.पुण्यात वज्रमूठ सभेचं आयोजन १४ मे रोजी करण्यात आलंय.या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जबाबदारी स्वतः अजित पवार यांच्याकडे आहे.
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवरून खोचक टीका केली. उद्धव ठाकरेंना देण्यात आलेली खुर्ची सिंहासन म्हटलं गेलं, मात्र ती त्यांना टेकण्यासाठीची सोय असल्याचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं.
