संजय राऊत यांच्याकडून शरद पवारांची वकीली, म्हणाले अदानी संदर्भातील भूमिका जुनीच

मुंबई : महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या मुलाखतीमुळे भूकंप झाला असताना आता संजय राऊत त्यांची वकीली करण्यासाठी उतरले आहेत. पवार साहेबांनी अदानींबाबत वेगळी भूमिका घेतली असली, तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारचे तडे जाणार नाहीत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. राऊत यांनी जेपीसीबाबत विरोधी पक्षाची मागणी ठाम असल्याचे स्पष्ट केले.

राउत म्हणाले, पवार साहेबांनी अदानींसंदर्भात वेगळी भूमिका घेतली असली तरी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचे तडे जाणार नाहीत. एलआयसी आणि स्टेट बँकेमधील पैसे हे जनतेचे पैसे आहेत. ते कशा प्रकारे भाजपनं आपल्या जवळच्या उद्योगपतींच्या खिशात घातले हे समोर आले. एका उद्योगपतीसाठी संपूर्ण देशाची शक्ती, प्रतिष्ठा कशी पणाला लावत आहेत हे सुद्धा समोर आले आहे.

शरद पवारांची ही भूमिका पहिल्यापासूनची आहे. त्यात नवीन काही नाही. शरद पवारांची भूमिका जेपीसीनं काही साध्य होणार नाही. जेपीसीचा अध्यक्ष भाजपचा असतो. त्यात बहुमत भाजपचे असते. जे त्यांना पाहिजे तसाच ते रिपोर्ट बनवणार आहेत. शरद पवारांनी न्यायालयीन चौकशीचा पर्याय दिला आहे. ममता बॅनर्जी असो, तृणमूल काँग्रेस किंवा एनसीपी अदाणींच्या बाबतीत त्यांचं वेगळे मत असू शकते. परंतु, त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीत महाराष्ट्रात किंवा राष्ट्रीय स्तरावर कोणतीही फूट पडणार नसल्याचेही ते म्हणाले.

‘जाने दो. राम सबका है, लेकीन राम सत्यवचनी है. अगर वहाँ बेईमान जायेगा तो उसे राम का आर्शिवाद नही मिलेगा” असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले,मुख्यमंत्र्यांना अयोध्येचा रस्ता आम्हीच दाखवलाय. रामाच्या चरणी सगळेच जातात. चांगली गोष्ट आहे. रामाच्या चरणी जाऊन महाराष्ट्रात केलेली पापे धुतली जाणार नाहीत.