राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे. हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन मागणी अर्ज कोर्टाने फेटाळला आहे, त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यावर आता ईडीच्या अटकेची टांगती तलवार आहे. भागदारक शेतकऱ्यांची फसवणूक आणि मोठा आर्थिक घोटाळ्याचे मुश्रीफ सूत्रधार असल्याचा दावा ईडीने कोर्टात केला होता. ईडीचा हा युक्तीवाद कोर्टाने मान्य केला आहे.
मुंबई सेशन्स कोर्टाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. सेशन्स कोर्टाच्या या निकालानंतर आता हसन मुश्रीफ मुंबई हायकोर्टात जातात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हसन मुश्रीफ हे सध्या ईडी कारवाईच्या ससेमिऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरी ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा छापेमारी केली. या छापोमारीतून ईडी अधिकारी त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण मुश्रीफांनी सुरवातीला चौकशीला जाणं टाळलं होतं. त्याऐवजी त्यांनी कोर्टाची पायरी चढत अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी पावलं उचलली. याप्रकरणी कोर्टाने त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला. त्यानंतर हसन मुश्रीफ ईडी चौकशीला सामोरं गेले. या सगळ्या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.
मुश्रीफांच्या जामीन अर्जावर दोन आठवड्यांपूर्वीच युक्तिवाद पूर्ण झाला होता. कोर्टाने याबाबतचा निकाल राखीव ठेवला होता. कोर्टाने ज्या तारखेला निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं त्यादिवशीही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आज अखेर हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल जाहीर करण्यात आला.
