राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्हही धोक्यात!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला साडेतीन जिल्ह्याचा पक्ष म्हणून हिणवले जाते. आता निवडणूक आयोगानेच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढला आहे. त्यामुळे या पक्षाचे घड्याळ हे चिन्हही धोक्यात येऊ शकते. त्याचा फटका इतर राज्यात निवडणुका लढविताना बसू शकतो.

नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आल्यामुळे आता पक्ष राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याच्या वल्गना नेत्यांकडून केल्या जात होत्या. मात्र प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्षासाठीचे किमान निकषही पूर्ण करू शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा राष्ट्रवादीला मोठा फटका बसू शकतो.

सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर पक्षाचे निवडणूक चिन्ह संपूर्ण देशभरात कायम राहते. या निवडणूक चिन्हावर इतर दावा करू शकत नाहीत. आता राष्ट्रवादीचे हे निवडणूक चिन्ह घड्याळ राखीव राहणार नाही.

राष्ट्रीय पक्ष असल्यास पक्षाचे मुख्यालय बांधण्यासाठी सवलतीच्या दरात सरकारी जमीन मिळते. राष्ट्रवादीने आता ही सवलतही गमवली आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाकडून निवडणूक मतदार याद्यांचे मोफत वितरण करण्यात येत होते. आता या मतदार याद्या मोफत मिळणार नाहीत. त्यासाठीचे शुल्क भरावे लागेल.

राष्ट्रीय पक्षाच्या दर्जामुळे राष्ट्रवादीला निवडणूक प्रचारात अधिकाधिक 40 स्टार प्रचारक नेमता येत होते. या प्रचारकांचा खर्च उमेदवारांसाठीच्या खर्चातून न होता पक्षाच्या खात्यातून केला जात होता. आता, त्यावरही बंधने येणार आहेत. त्यामुळे आता स्टार प्रचारक खर्च उमेदवाराच्या खर्चात धरला जाईल.

सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यकाळात दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर पक्षाच्या प्रचारासाठी वेळ मिळत होता. राष्ट्रवादीला आता ही संधी मिळणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक राज्यात निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या पक्षातील ताकदवान नाराज आले तर आपला आपला पक्ष वाढेल यासाठी तेही प्रयत्न केले. मात्र महाराष्ट्रशिवाय अगदी अपवाद वगळता कुठेही प्रतिसाद मिळाला नाही.

2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार उभे केले होते. त्यावेळी हाच फॉर्मुला वापरला होता. यामुळे काँग्रेसच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाल्याचेही बोलले जाते. मात्र आता निवडणुकीवर प्रभाव टाकण्यातही राष्ट्रवादी अपयशी ठरली आहे.