राज्य शासनाच्यावतीनं देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (रविवारी) 16 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे. या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: दोन वेळेस सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सोहळ्याच्या आयोजनात सहभागी अधिकारी, कर्मचारी, श्री सदस्य यांना सोहळा यशस्वीतेसाठी आवाहन केलं आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण कार्यक्रम, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, व्यसन मुक्ती केंद्रांची स्थापन, आरोग्य शिबिर, समाज प्रबोधन व बाल संस्कार वर्ग यांसारखे अनेक मोलाचे कार्य दिले आहे. देशाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण देशाला काय देतो हे जास्त महत्त्वाचे ठरते असा धर्मजागृतीचा वसा त्यांनी लोकांपर्यंत मांडला. मानवता हाच धर्म असा लोककल्याणाचा मार्ग त्यांनी समोर ठेवला आहे.
सकाळी साडे दहाच्या सुमारास हा सोहळा होणार आहे. त्यासाठी महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि श्री सदस्य त्यासाठी परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.
