विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्ट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 30 जून रोजी सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले.शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत दीपक केसरकर यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते.

शाळेत दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत यावर्षी देखील मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केले जाणार आहे. शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा 26 एप्रिल पासून आणि दुसरा मेळावा जून महिन्यात घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राचा नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यातही राबविला जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. यावर्षीपासून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्या, बूट आणि सॉक्स हे शासनातर्फे दिले जाणार आहेत. पुस्तकांमध्ये प्रत्येक धड्यानंतर टिपण (नोटस्) काढण्यासाठी आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईल, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.