मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर घटेल, असा कोणताही अहवाल आपण दिला नसल्याचे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
विनोद तावडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे, ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विनोद तावडे यांच्या नेतृत्त्वाखाली नेमलेल्या समितीने अंतर्गत सर्वेक्षणाचा अहवाल केंद्रीय नेतृत्त्वाला दिल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस २ सुरू केल्याची चर्चा सुरु आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांनी मंगळवारी रात्री ट्विट करुन स्पष्टीकरण दिले. या सगळ्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून लोकसभा निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक राज्याचा आढावा घेत असून त्यानुसार भाजप पुढील रणनीती निश्चित करेल. या समितीचे निमंत्रक म्हणून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप कोणत्या जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता, याचीही माहिती समितीकडून घेतली जात आहे. या अभ्यासाअंती भाजपच्या या केंद्रीय समितीकडून संबंधित राज्यातील संघटनात्मक कार्यक्रम, नेत्यांच्या कार्यक्रमाचे आणि दौऱ्यांचे नियोजनही केले जाईल.
