अजितदादांचा इंगा आणि संजय राऊत सुतासारखे सरळ!

मुंबई : बेताल वक्तव्ये करण्याची सवय असलेल्या खासदार संजय राऊत यांना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी चांगलाच इंगा दाखवला. यामुळे सुतासारखे सरळ झालेल्या राऊत यांना अजित पवार खूप गोड माणूस आहे. आमच्यात कसलाही वाद नाही, असे सांगण्याची वेळ आली.

गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि संजय राऊत या महाविकास आघाडीतील शिलेदारांमध्ये जुगलबंदी रंगली होती. त्यांचे बाइट सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर आजही अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले. कोण संजय राऊत असा प्रश्न केला. या साऱ्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मवाळ भूमिका घेतली आहे.
राऊत म्हणाले, अजित पवार खूप गोड माणूस आहेत. ते सर्व लोकांशी प्रेम करतात. पवार कुटुंबातल्या कोणत्याही घटकाशी माझा कधीच वाद नव्हता आणि नाही. परवाच आम्ही एका टेबलावर बसून जेवण केले. अजित पवार हे महाविकास आघाडीचे सर्वात ज्येष्ठ आणि लोकप्रिय नेते आहेत. ते राहतील.

पवार कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत, असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोकमधून शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या मार्गावर असल्याचे म्हटले होते. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा संदर्भ दिला होता. पवार कुटुंबावर तपास यंत्रणांचा दबाव असल्याचाही दावा केला होता. या वक्तव्यावर अजित पवारांनी राऊतांचे नाव न घेता आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचे तुम्हाला कोणी वकील पत्र दिले? असा सवाल केला होता.

संजय राऊतांनी ‘मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, मी अजित पवारांचे का ऐकून घेऊ, माझ्यासाठी शरद पवारांची भूमिका महत्वाची आहे. मी फक्त शरद पवारांचे ऐकतो. शिवसेना फुटली तेव्हा मी आमचीच वकील केली, अशा शब्दांत अजित पवारांना प्रत्युत्तर दिले होते.

आज अजित पवारांनी कोण संजय राऊत ? मी कोणाचेही नाव घेतले नव्हते. त्यामुळे कोणाला लागण्याचे कारण नाही. मी माझ्या पक्षासंदर्भात बोलल्याची टोलेबाजी केली आहे. हा वाढता वाद पाहता अखेर संजय राऊतांनी नमते घेत, अजित पवार फार गोड माणूस असल्याचे म्हणत आमच्यात कसलाही वाद नसल्याचे सांगितले.