संजय राऊतांच्या दाव्याला अजित पवारांचे उत्तर; कोणत्या आधारावर असं वक्तव्य केलं हे आपल्याला माहिती नाही

संजय राऊतांच्या सरकारवरील वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकद चर्चेला उधाण आलं आहे. १५ दिवसांत शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार, राऊतांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी कोणत्या आधारावर असं वक्तव्य केलं हे आपल्याला माहिती नसल्याचं अजित पवार म्हणालेत.माझी आणि संजय राऊत यांची नागपूरच्या सभेनंतर भेट झाली नाही. त्यानंतर आम्ही फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटलो नाही. त्यांना कुठली माहिती मिळाली हे मला माहित नाही. त्यांच्याप्रमाणे अनेक लोक वेगवेगळे वक्तव्य करत असतात. अशी वक्तव्य त्यांच्या अनुभववातून किंवा सोर्सच्या आधारे करत असतात. त्यामुळे ती माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी काही सांगू शकत नाही. अजित पवार हे बारामती येथे माध्यमांशी बोलत होते.

शिवसेना ठाकरे गटाची आज पाचोऱ्यामध्ये सभा होणार आहे. यावेळी सभेच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी 15 दिवसांत शिंदे सरकार कोसळणार असं म्हटलं होतं. एकनाथ खडसे यांनी असं म्हटलं की, अजित पवार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होऊ शकतात. खडसे यांच्या या विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले, प्रत्येकजण आपआपली गणितं मांडत आहे. आम्ही निकालाची वाट पाहतोय. पण सध्या जे मुख्यमंत्री आणि त्याचं 40 लोकांचं राज्य आहे. ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्याशिवाय राहणार नाही.

पुढे अमृता फडणवीस यांनी अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर केलेल्या वक्तव्यवर अजित पवार म्हणाले की, कुणी मला जर चांगले म्हणत असेल तर तुमच्या का पोटात दुखतं? प्रत्येकाने चांगले काम करावे जेणेकरून लोकांनी त्याला चांगलं म्हणावं. त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.