पुढील दोन दिवसात मी राजकीय गौप्यस्फोट करणार; करुणा मुंडेंचा इशारा

शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, चार दिवसात राजकीय गौप्यस्फोट करणार आहेत. सध्या महाराष्ट्रात बाजार समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्या निवडणुकीत अतिशय घाणेरडा प्रकार चालू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

करुणा मुंडे म्हणाल्या, “मी संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत आहे. कारण महाराष्ट्रात सध्या सगळीकडे बाजार समितीच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीत खूप घाणेरडापणा सुरू आहे. खालच्या पातळीवर जाऊन काम करत आहेत. त्याचा मी लवकरच भांडाफोड करणार आहे. मी जो गौप्यस्फोट करणार आहे तो राजकारणाशी संबंधित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण सगळे लोक बघू शकतात.”

महाराष्ट्रात राजकारणामध्ये जो घाणेरडापणा चालू आहे, तो घराणेशाहीचा आहे आणि ही घराणेशाही जी आहे, ती लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करुणा मुंडेंनी केली आहे.“दोन दिवसांनी माझ्याकडे एक व्हिडीओ येणार आहे. तो व्हिडीओ आला की मी भांडाफोड करणार आहे. सध्या माझ्याकडे काही रेकॉर्डिंग आणि कागदपत्रे आहेत. व्हिडीओ आला की मी हा भांडाफोड करणार आहे,” असा इशारा करुणा मुंडे यांनी दिला.