‘सिंघम 3’ च्या रिलीज डेटची घोषणा! अजय देवगणसह दीपिकाही दिसणार चित्रपटात

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी हे इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीजपैकी एक आहे. अजय देवगणच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या ‘सिंघम’ या चित्रपटाचे नाव निश्चितपणे टॉप लिस्टमध्ये सामील होईल. अजयने आतापर्यंत सिंघम आणि सिंघम रिटर्न्समधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आता अजय देवगण आणि रोहीत शेट्टी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज आहेत. सिंघमचा तिसरा भाग अर्थात ‘सिंघम अगेन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

अजयच्या ‘सिंघम अगेन’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. ‘सिंघम अगेन’ हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2023 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. ‘सिंघम’ आणि ‘सिंघम 2’ हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून ते आता ‘सिंघम 3’ची प्रतीक्षा करत आहेत.

यावेळी ‘सिंघम ३’ प्रेक्षकांसाठी खूप खास असणार आहे, कारण अजय देवगणच्या सोबत दीपिका पदुकोण पडद्यावर दिसणार आहे. रोहित शेट्टीने ‘सर्कस’च्या एका कार्यक्रमात दीपिका लेडी सिंघम होणार असल्याची घोषणा केली होती. पोलिसांच्या गणवेशात ती अॅक्शन करताना दिसणार आहे.

अजय देवगण ‘भोला’मध्ये दिसला होता. त्यानंतर अजय मैदान या बायोग्राफिकल स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीमच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २३ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.