मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा लता दीनानाथ मंगेशकर हा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना लता दीदींच्या आठवणीत आशा भोसले भावूक झालेल्या दिसून आल्या.
पुरस्कार स्वीकारताना आशा भोसले यांना त्यांच्या मोठ्या बहिणीची खूप आठवण आली. त्या म्हणाल्या की, मी येथे मंचावर उपस्थित असलेल्या सर्व लोकांना नमस्कार करू शकत नाही, मला आशीर्वाद द्यायला आवडेल, कारण माझे आशीर्वाद देण्याचे वय आहे. माझे वय 90 वर्षे आहे. माझा जन्म 1933 मध्ये झाला आणि मी फक्त 10 वर्षांची असताना 1943 पासून गात आहे. माझी एकच इच्छा आहे, की मी माझ्या बहिणीसाठी हा पुरस्कार घेत आहे.
याच सोहळ्यात भारतीय संगीतातल्या योगदानासाठी पंकज उधास यांना, तर अभिनयक्षेत्रातल्या योगदानासाठी विद्या बालन आणि प्रसाद ओक यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्तम मराठी नाटकासाठीचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ‘नियम व अटी लागू’ या नाटकाला देण्यात आला. पंडित हृदयनाथ मंगेशकर हे ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘लता दीनानाथ मंगेशकर’ या पुरस्काराआधी आशा भोसले यांना राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
