बीड: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या असंवेदशीलतेचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. बीड शहरातील कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांचा उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून तिरुपतीला नवस फेडण्यासाठी पायी जात असताना त्यांचा कर्नाटक मध्ये मृत्यू झाला होता. दीड वर्षात उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबाची साधी विचारपूसही केली नाही. मात्र; एकनाथ शिंदे यांनी या कुटुंबाला आता दोन मजली सुंदर असं घर बांधून दिले आहे. घरात सर्व सुविधा देखील दिल्या आहेत.
तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि येणाऱ्या काळातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावा असा नवस या कडवट शिवसैनिकाने केला होता. बीड ते तिरुपती बालाजी असा पायी जाण्याचा संकल्प केला. त्यांनी त्याच दिशेने प्रवास सुरू होता. मात्र, कर्नाटक पर्यंत पोहोचल्यावर त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर संपूर्ण रुईकर कुटुंब उघड्यावर आले. पत्नी, मुलगी, मुलगा आणि वयोवृद्ध वडील रुईकरांवर अवलंबून होता.
घराच्या लोकार्पणावेळी रुईकरांच्या पत्नी कीर्ती यांनी उद्धव ठाकरेंविषयी खंत बोलून दाखवली. ठाकरेंसाठी जीव गेला मात्र त्यांच्याकडून नंतर कोणतीही विचारपूस झाली नाही यांचं खूप वाईट वाटतं. उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून माझ्या पतीने जीव दिला. उद्धव साहेब फोन करून कुटुंबाला आधार देतील असं वाटलं होतं. पण दीड वर्षात विचारपूसही केली नाही. माझ्या पतीचा जीव व्यर्थ गेला. लेकरांना वडील नाही, मला नवरा नाही. हे बलिदान व्यर्थ गेल, असं म्हणत कीर्ती सुमंत रुईकर यांनी खंत व्यक्त केली.
कीर्ती रुईकर यांनी मुख्यमंत्र्यांसारखा भाऊ पाठीशी मिळाल्याची भावनाही व्यक्त केली. निष्ठावान शिवसैनिकाच्या कुटुंबाला वाऱ्यावर न सोडणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पुन्हा व्हावेत असे त्या म्हणाल्या.
