मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर असल्याची जोरदार चर्चा काल राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. यावरून महाविकास आघाडीनेही मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, याबाबत आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर गेले आहेत. अशी टीका केली होती. यावर प्रतिउत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले की, “मी आता सातारा दौऱ्यावर आहे. इथे येऊन मी तापोळ्यातील पुलाची पाहणी केली आणि तापोळा महाबळेश्वर रस्त्याचे भूमिपूजनही केले. तसेच महाबळेश्वर येथील पर्यटनांच्या दृष्टीनेही आढावा बैठकही घेतली, त्यामुळे मी सुट्टीवर आहे, हे खरं नाही. खरं तर मी डबल ड्युटीवर आहे”
पुढे बोलताना बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. “विरोधक माझ्यावर आरोप करतात कारण त्यांच्याकडे काहीही कामं शिल्कल राहिलेले नाही. त्यांना आरोप केल्याशिवाय दुसरं कोणतंही काम नाही. आम्ही त्यांना घरी बसवलं आहे. त्यामुळे ते आरोप करतीलच. मात्र, आम्ही त्यांना आरोपाचं उत्तर आरोपाने नाही, तर कामाने देऊ”, असे ते म्हणाले. तसेच “मी साताऱ्यात येऊन आराम केलेला नाही. साताऱ्यात आल्यानंतर अनेक जण भेटायला आले. येथील जनतेचे प्रश्न सोडवण्यावर माझा भर आहे. त्यासाठी सातत्याने बैठका होत आहेत”, असंही त्यांनी नमूद केलं.
