राज्यात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवस नागपूर दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. मंगळवारी पोलिस आय़ुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मुंबई दौऱ्यानंतर आता अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. एकाच महिन्यात अमित शहा यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे.
आज रात्री अमित शहा यांचे नागपूरात आगमन होणार आहे. पक्षीय बैठकाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा रात्री नागपूरमध्ये अमित शहा यांच्या भेटीसाठी येणार आहेत. अमित शहांच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावर उपस्थित राहणार आहेत.
