महाविकास नव्हे महाविरोधाभास आघाडी, सत्ता येण्याआधीच मुख्यमंत्रीपदावरून भांडण, नरेश म्हस्के यांची टीका

मुंबई : महाविकास ही तर महाविरोधाभास आघाडी आहे. कोणामध्येच एकमत नाही. सत्ता येण्याआधीच मुख्यमंत्रीपदावरून भांडण सुरू झाले असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे.

म्हस्के म्हणाले, आज नाना पटोले बोलत आहेत की, आमचा प्लॅन बी तयार आहेत. ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री. सगळ्यात जास्त आमदार राष्ट्रवादीचे. त्यानंतर काँग्रेसचे परंतु या शिवसेनेची महत्त्वाची खुर्ची लावली जात आहे. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा मागे घेतलेला आहे. महाविकास आघाडीत केवळ अस्थिरता आहे. या ठिकाणी सत्ता येण्याच्या आधीच मुख्यमंत्री कोण याच्यावर आता पासून भांडत आहेत. बाजारात तुरी आणि यांच्यात मारामारी असे झाले आहे. सभेमध्ये कोणी वाचन करायचं याच्यावरून ते भांडत आहेत. उद्या एकमेकांचे कपडे देखील फाडतील.

नाना पटोले बोलत आहेत की प्लॅन बी तयार आहे. परंतु खऱ्या अर्थाने प्लॅन कोणाचा सक्सेस झाला असेल तर तो संजय राऊत यांचा, असा आरोप करून म्हस्के म्हणाले, संजय राऊत यांना शिवसेना संपवायची होती. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व संपवायच होत. हे त्यांनी प्लॅन करून संपवले आहे. अजित पवार यांचे खच्चीकरण करायचे होते. ते त्यांनी केले आहे. केवळ कुठल्यातरी एका व्यक्तीला महाराष्ट्रातील राजकारणात स्थिर करायचा आहे. हे करण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे प्लॅन करून खच्चीकारण केलेल आहे. इलेक्शनला अजून वेळ आहे. पण त्याच्या आधीच कोणीतरी बोलतेय की मुख्यमंत्री व्हायला आवडेल. उद्या संजय राऊत देखील बोलतील की माझे देखील मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावा.

म्हस्के म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत फक्त तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा बोलले जात आहेत. मिंधे,खोके , माझा बाप चोरला, मर्द या व्यतिरिक्त कोणतेही मुद्दे नसतात. आता मुंबईमध्ये सभा आहे म्हणून कॉन्ट्रॅक्टर खड्डे आणि रस्ते याच्या व्यतिरिक्त कोणतेही विषय त्यामध्ये नसणार. प्रत्येक सभेमध्ये वाचलेली भाषणे आहेत. फक्त वरची खालची लाईन बदलतात.