कोकणातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प आता बारसू येथे होणार आहे. यासाठी येथे सर्वेक्षणही सुरू करण्यात आले. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. अधिकारी सर्वेक्षणाला येणार असल्याचे समजताच स्थानिकांनी तेथे आंदोलन पुकारले. स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असल्याने सरकारने येथे प्रकल्प राबवू नये अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. ठाकरे गटानेही या प्रकल्पाविरोधात आवाज उठवला आहे. मात्र, दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते आणि राजापुरातील स्थानिक आमदार राजन साळवी यांनी ट्वीट करत प्रशासनाकडेच साकडे घालून प्रकल्पाला समर्थन दर्शवलं आहे.
‘कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच….माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी त्यांच्यावर अन्याय करू नये….’ असं ट्विट करत साळवी यांनी सत्ताधारी नेत्यांना टॅग केले आहे.
“रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथील जागा उद्धव ठाकरेंनीच सुचवील होती”, असा मोठा दावा काल (२५ एप्रिल) शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी तो पर्याय सुचवला असेल. परंतु, या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याने आम्हीही लोकभावनेच्या बाजूने असू. प्रकल्पाविरोधात येथील लोक गोळ्या झेलायला तयार असतील तर पहिली गोळी शिवेसनेच्या छातीवर जाईल.

